भावनिक बुध्दिमत्ता : दैनंदिन जीवनातील आवश्यक कौशल्य

 भावनिक बुध्दिमत्ता : दैनंदिन जीवनातील आवश्यक कौशल्य


भावनिक बुध्दिमत्ता म्हणजे काही एक कौशल्य नव्हे तर ते विविध घटकांचे एकत्रित संयोजन आहे. 
दैनंदिन जीवनात करता येणाऱ्या काही सोप्या कृती हे घटक स्वतः मध्ये रुजवून भावनिक बुध्दीमत्तेस पूरक 
ठरु शकतात. 

डॅनिअल गोलमन यांच्या मते, ‘स्वत:च्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे, आपल्या 
जवळील व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणे, स्वयंप्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणे, 
वागण्यात व स्वभावात लवचिकपणा असणे या सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात' तर मेयर 
व सोलोव्हे या मानसशास्त्रज्ञांच्या मते, 'भावनिक बुध्दिमत्ता म्हणजे व्यक्तीची अशी क्षमता ज्यामुळे भावना समजून 
घेता येतात.संभाषणाद्वारे , संदेशाद्वारे व हावभावाद्वारे स्पष्ट होणाऱ्या भावना समजून घेऊन त्याचे योग्य व्यवस्थापन 
करून विशिष्ट उद्दिष्टे साध्य करता येतात.'

एकंदरीत, भावनिक बुध्दिमत्ता म्हणजे भावना जाणून, समजून, त्यांचे व्यवस्थापन तसेच वापर करणे, ज्यामुळे 
विचारांना दिशा मिळून कृती करण्यास मार्गदर्शन मिळते. ही सर्व प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आपण भावनिक 
बुध्दीमत्तेच्या पाच घटकांवर काम करू शकतो. 


भावनांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी भावनिक दृष्ट्या स्थैर्य आणि भावनिक परिपक्वता ह्यांसोबत भावनिक 
बुद्धिमत्तेच्या प्रमुख पाच घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. 
आत्मप्रचिती (सेल्फ अव्हेरनेस) : स्वत:च्या भावना, मर्यादा, बलस्थाने यांची जाणीव असणे, स्वतःच्या क्षमतांचे 
यथायोग्य मूल्यमापन करणे, आत्मविश्वास असणे, आपले निर्णय घेण्यासाठी भावनांचा प्राधान्यक्रम ठरवून 
त्याचा वापर करणे, इत्यादी गोष्टी आत्मप्रचिती या घटकात येतात.
आत्मनियमन (सेल्फ रेग्युलेशन) : यामध्ये स्वतःच्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवणे, सुयोग्य पद्धतीने 
भावनांची हाताळणी करणे, कोणताही निर्णय सद्सद्विवेकबुद्धिने घेणे, सद्य परिस्थितीशी जुळवून घेणे इत्यादी 
बाबी आत्मनियमन या घटकात येतात. 
प्रेरणा (मोटिव्हेशन) : यामध्ये आपल्या जीवनाची ध्येये ठरविणे, ध्येयांचा प्राधान्यक्रम ठरविणे,  ती ध्येये 
गाठण्यासाठी प्रयत्न करणे, निरुत्साहावर मात करणे, आशावादी राहणे इत्यादी बाबींचा अंर्तभाव होतो. 
समानानुभुती (एम्पथी) : यामध्ये इतरांच्या भावना, संवेदना समजून घेणे, त्याबद्दल जाणीव असणे, एखाद्या 
प्रसंगाकडे इतरांच्या दृष्टीने पाहता येणे किंवा त्या दृष्टीने विचार करता येणे, समाजातील विविध प्रकारच्या 
भिन्नतेची जाणीव होणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. 
सामाजिक कौशल्ये (सोशल स्किल्स) : यामध्ये घटकांतर्गत समाजातील विविध प्रसंग, घटना यांची अचूकपणे 
जाणीव, नातेवाईक व समाजातील अन्य व्यक्तींबरोबर सुरळीत संबंध, परिणामकारकतेने मने वळविण्याची 
तंत्रे, श्रवणकौशल्य, नेतृत्त्व, वादविवाद, सहकार्य, सांघिक कार्य इत्यादींचा समावेश होतो. 

भावनिक बुध्दीमत्तेचे वरील घटक स्वतः मध्ये रुजवण्यास भावनिक बुध्दीमत्तेस पूरक अशा पुढील विविध 
क्रियांचा दैनंदिन जीवनात समावेश करु शकतो : -
  • इतरांना अभिप्राय विचारणे
  • आपले विचार आणि भावना लिहून ठेवणे
  • आपले विचार आणि भावनांकडे लक्ष देणे
  • आपल्या आवडींचा पाठपुरावा करणे
  • तुमच्या अनुभवांवर विचार करणे
  • आव्हानांकडे संधी म्हणून पहाणे.
  • आपल्या संभाषण कौशल्यांचा सराव करणे
  • आपल्या भावना स्वीकारण्यावर कार्य करणे
  • आपण कसे प्रतिसाद द्याल याची निवड आपल्याकडे आहे हे जाणून घेणे. 
  • नवीन कौशल्ये शिकणे. 
  • ध्यान करण्याचा सराव करणे
  • नवीन लोकांशी बोलणे.
  • दुसऱ्याच्या जागी स्वतःची कल्पना करण्याचा प्रयत्न करणे.
  • लहान, मोजण्यायोग्य ध्येये सेट करण्यावर लक्ष केंद्रित करणे व ध्येय साध्य झाल्यावर स्वत:ला 
  • बक्षीस देणे. 
दैनंदिन जीवनातील सवयींमध्ये काही प्रमाणात बदल करून अथवा काही नवीन सवयी आत्मसात करून 
आपण आपल्या भावनांचे योग्य व्यवस्थापन करू शकतो. तसेच भावनांचे व्यवस्थापन न झाल्याने त्याचा आपल्या 
मानसिक स्वास्थ्यावर, दैनंदिन जीवनावर, नातेसंबंधांवर विपरीत परिणाम होत असेल तर मानसशास्त्रीय 
समुपदेशन आपल्यासाठी उपयुक्त ठरु शकते. 

- आकांक्षा ब्रह्मे , समुपदेशक व मानसशास्त्रज्ञ

संचालिका, कृतधी सेंटर फाॅर वेलबिंग


संदर्भ 
www.vishwakosh.marathi.gov.in
www.verywellmind.com





Comments

Popular posts from this blog

करिअर निर्णय आणि पालक.